"मला नरेंद्र नावाचीच चीड."; पाकिस्तानी बॉक्सरचा किस्सा सांगताच पंतप्रधान मोदींनाही हसू आवरेना! VIDEO व्हायरल
कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये पदकाविजेत्या भारतीय खेळाडूंची रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पुरुषांच्या ९०+ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावणाऱ्या भारतीय बॉक्सर नरेंद्र बेरवाल यांनी पाकिस्तानच्या बॉक्सरशी संबंधित एक मजेशीर किस्सा सांगितला.
हा किस्सा ऐकल्यावर पंतप्रधानांनाही आपले हसू आवरता आले नाही. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'पाकिस्तानकडून हरायचं नाही…'
नरेंद्र बेरवाल यांनी २०१५ मध्ये झालेल्या वर्ल्ड मिलिटरी गेम्समधील एक आठवण पंतप्रधान मोदींसोबत शेअर केली. त्यांनी सांगितले की, २०१५ मध्ये तो वर्ल्ड मिलिटरी गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी गेला होता. त्याच्या पहिल्याच सामन्यात त्याची लढत पाकिस्तानच्या बॉक्सरसोबत झाला. त्यावेळी भारतीय लष्कराकडून त्यांना फोन आला होता. 'काहीही झालं तरी पाकिस्तानकडून हरायचं नाही,' असा स्पष्ट संदेश त्याला देण्यात आला होता.
यानंतर झालेल्या पहिल्या बाऊटमध्ये नरेंद्रने पाकिस्तानी बॉक्सरचा ४-१ असा पराभव केला. मात्र, दुसऱ्या बाऊटमध्ये त्याला पाकिस्तानी खेळाडूकडून कडवी झुंज मिळाली. हा सामना नरेंद्रने ३-२ असा जिंकला. मात्र, या लढतीदरम्यान दोन्ही बॉक्सर्सची डोकी एकमेकांना धडकली आणि दोघांनाही दुखापत झाली. या लढतीनंतर दोन्ही खेळाडूंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
'मला नरेंद्र नावाचीच चीड आली!'
बेरवाल यांनी पुढे सांगितले की, २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान झाले होते. २०१५ मध्ये वर्ल्ड मिलिटरी गेम्ससाठी भारतीय संघासोबत गेलेल्या लष्कराच्या कोचचे नावही नरेंद्र राणा होते. याच पार्श्वभूमीवर रुग्णालयात असताना पाकिस्तानी बॉक्सरने त्यांना म्हटलं होतं की, "तुमचं नाव नरेंद्र, तुमच्या कोचचं नाव नरेंद्र आणि तुमच्या पंतप्रधानांचेही नाव नरेंद्र. मला आता नरेंद्र नावाचीच चीड आली आहे." हा किस्सा सांगताच पंतप्रधान मोदी मोठ्याने हसताना दिसले. या भेटीतील हा मजेशीर संवाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.