- मधुकर भावे
डी. वाय. दादा गेले. ९१ व्या वर्षी गेले. चार वर्षे ते प्रकृतीशी झुंजत होते. पण शांत असायचे. त्यांना होणारा त्रास त्यांनी कधीही व्यक्त केला नाही. अगदी स्थितप्रज्ञ. डी. वाय. दादा किती मोठे होते, हे महाराष्ट्राला शेवटपर्यंत कळले नाही. जसे वसंतदादा आणि राजारामबापू यांच्या बाबतीत झाले, तसेच डी. वाय. दादांच्या बाबतीत झाले, असे म्हणता येईल. डी. वाय. दादांचा माझ्यावर का आणि किती लोभ होतो, याचे उत्तर मलाही शेवटपर्यंत कळले नाही. ते किती मोठे व्यक्तिमत्त्व होते आणि महाराष्ट्रातील किती आघाड्यांवर काम करत होते... शिक्षण, सामाजिक कार्य, क्रीडा त्याहीपेक्षा अडी-अडचणींतील प्रत्येकाला मदत करण्यात आघाडीवर असलेले वसंतदादांसारखेच डी. वाय. दादा होते. आज १९६७ सालची आठवण झाली. राजारामबापू यांनी माझी आणि डी. वाय. दादांची पहिली ओळख करून दिली. त्यावेळी ते शिक्षण क्षेत्रात उतरले नव्हते. राजकारणातच होते. पक्के काँग्रेसवाले होते. १९६७ च्या निवडणुकीत त्यांना ‘गगनबावडा विधानसभा मतदारसंघ’ ंहवा होता. पण प्रदेश काँग्रेस निवडणूक मंडळाने तो मतदारसंघ दादांना द्यायला नाकारले. त्याएेवजी ‘पन्हाळा’ मतदारसंघ दिला. बापू म्हणाले, ‘पन्हाळा तर पन्हाळा..’ आणि त्या निवडणुकीपासून डी. वाय. दादा हे व्यक्तिमत्त्व असे काही जवळून पाहता आले आणि पुढे तर ५० वर्षे गट्टीच जमून गेली. अगदी गेल्या दोन वर्षांपूर्वी कोल्हापूरला जावून दादांची कडकडून मिठी पडेपर्यंत... दादा हे अती जीव लावणारे होते. दादांना भेटले की आनंद वाटायचा. त्यांचे आगद-स्वागत लाजवून टाकायचे. चांदीच्या ताटातील त्यांच्याकडील जेवण आणि त्यांचा कामाचा आवाका... दादांची तब्बेत, तसे म्हटले तर फार बिघडलेली नव्हती. त्यांचा हात हातात घेतला की जाणवायचे की, हा लोखंडासारखा हात आहे. इतके ते शरिरयष्टीने मजबूत होते. खाशाबा जाधवांशी कुस्ती खेळलेले महाराष्ट्रातील ते एकमेव राजकारणी आहेत. त्या कुस्तीचा फोटोही दादांनी मला दाखवला होता. दादांचा दरबार नेहमी खुला असायचा. सलग दोन वेळा आमदार राहिलेले दादा राजकारणात फार रमले नाहीत आणि झटकन सांधा बदलून महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी केवढी क्रांती केली. अभिमत विद्यापीठ आणि डी. वाय. पाटील स्टेडियम ही दादांची केवढी मोठी स्मारके आहेत. त्यांना पद्मश्री मिळाली... ते राज्यपाल झाले... पण, राज्यपालाचा ‘महामहिम’पणा दादांना कधीही चिकटला नव्हता. ते त्रिपुराचे राज्यपाल असताना आणि बिहारलाही राज्यपाल म्हणून आल्यावर दोन्हीवेळा त्यांनी मला बोलावून घेतले. पाटण्याला जाताना तर, दादांचे जावई डॉ. पी. डी. पाटील, सचिन इटकर सोबतच होतो. दादांनी पाटणा विमानातळावर आम्हाला घ्यायला राज्यपालाची गाडी त्यांच्या ए.डी.सी. सह पाठवली. चार दिवसांचा राजभवनात मुक्काम...
गेल्या ५० वर्षांच्या सहवासात दादांनी ते कोणी मोठे आहेत, असे कधीच जाणवू दिले नाही. सामान्यातील सामान्य माणूस भेटला की, थक्क व्हायचा. त्याचे पहिले कारण दादा त्यांना विचारायचे ‘तुझी जन्मतारीख काय?’ अशा अनेकजणांना दादा जन्मतारीख विचारताना मीच थक्क होऊन जायचाे. मी म्हणायचो, ‘दादा जन्मतारीख कशाकरिता विचारता तुम्ही?’ दादांनी काय सांगावे, ‘अरे त्याच दिवशी त्याच्या वाढदिवसाचे अभिनंदन करण्याची आपल्याला संधी मिळते.’ मोठी माणसं मनाने किती मोठी असतात.. त्यांचे मोठेपण पदामुळे नसते. अगदी अलिकडे-अलिकडे दादांची स्मृती तल्लख असेपर्यंत प्रत्येक दिवशी सकाळी पाच-पन्नास लोकांना वाढदिवसाच्या अभिनंदनाचे फोन दादांनी केले नाहीत, असे कधी घडले नाही. त्यांनी ‘पद्मश्री’ कधीही मिरवली नाही. आणि राज्यपाल पदही त्याहून मिरवले नाही. माजी राज्यपाल म्हणून त्यांच्या गाडीसमोर पोलिसांची गाडी त्यांनी कधीही येवू दिली नाही. त्यांचे सुपुत्र बंटी पाटील हे गृहराज्यमंत्री असताना त्यांनासुद्धा सुरक्षेची गाडी नाकारली. इतके साधेपण त्यांचे होते. त्यांच्या हातावर एक घड्याळ होते. सुरुवातीला हजीअलीजवळील त्यांच्या फ्लॅटमध्ये गेल्यावर ते आज सकाळी किती पावले चाललो, ते घड्याळात दाखवायचे. मग वरळी सीफेसला ‘स्ाील्वर’ इमारतीत २४ व्या मजल्यावर दादा आल्यावर तिथेही जेव्हा-जेव्हा भेट व्हायची तेव्हा त्यांचे १० हजार पावले चालून झालेले असायचे. सकाळी तासभर पोहणेही झालेले असायचे. प्रकृतीच्या बाबतीत ते स्वत: तसे खूप दक्ष होते. पण त्यांना आत्िमक त्रास काय होतोय, हे त्यांनी कधी जाणवू दिले नाही. मी त्यांच्याकडे अगदी आत्मियतेने मुद्दाम जायचो ते गप्पा मारायला... नाहीतर दिवसभर ते असे एकटे बसल्यासारखे वाटायचे. पण त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती होती. माझ्याबरोबर अनेक जणांना मी त्यांच्याकडे घेवून गेलोय.. त्या कोणालाही दादा परके वाटलेच नाहीत. महाराष्ट्र टाईम्सचे क्रीडा संपादक बाळ करमरकर एकदा माझ्या बरोबर दादांकडे आले. ओळख करून दिली. दादांनी लगेच शाल मागवली, गुच्छ मागवला... बाळचा सत्कार केला. आणि किमान तासभर क्रिकेटवर ते बोलत राहिले. बाळशी क्रिकेटवर चर्चा करणे सोपे नव्हते. दादांनी त्याला थक्क करून टाकले. इंग्लंडचा डेरेक अंण्डरवूड हा स्पीन गोलंदाज नाही आपल्या भागवत चंद्रशेखर सारखा मध्यम जलदगती गोलंदाज आहे. असे दादांनी सांगितले तेव्हा बाळ चॅट पडला. मी दादांना म्हणालो की, ‘परदेशातील क्रिकेट सामन्यांचे वृत्तसंकलन करायला टाईम्स अॅाफ इंडियाच्या क्रीडा विभागातील प्रमुखाला पाठवले जाते... पण, महाराष्ट्र टाईम्स काही करमरकर यांना कुठे परदेशात पाठवत नाही...’ दादांनी लगेच सांगितले की, ‘बाळासाहेब, तुम्हाला कोणते सामने कव्हर करायला कुठे जायचे अाहे ते सांगा... तुमची सगळी व्यवस्था करून देतो... तुमचे समालोचन इतके अप्रतिम असते की, मी महाराष्ट्र टाईम्स तुमच्यासाठी आगोदर शेवटचे पान वाचतो...’ दादा तासभर बोलत होते. करमरकर यांनी नम्रपणे नकार देत सांगितले की, ‘तुमच्या मदतीबद्दल आभार... पण, माझ्या कार्यालयाने पाठवले तरच मी परदेशातील सामने कव्हर करीन.’ त्यांचे शब्द ऐकल्यावर दादाही गदगद झाले.
डी. वाय. दादांच्या नावाचे क्रिकेट स्टेडियम हे केवळ नावापुरते
नाही. क्रिकेटचे बारकावे त्यांना पूर्ण माहिती आहेत. कुस्तीतले बारकावे त्यांना माहिती आहेत. श्रीपती खंचनाळे, गणपतराव आंदळकर, मारूती माने या पहिलवानांवर वसंतदादांनी जेवढे प्रेम केले तेवढेच प्रेम डी. वाय. दादांनी केले.
डी. वाय. दादांचा ८५ वा वाढदिवस २२ अॅाक्टोबर २०१८ ला होता. सप्टंेबर महिन्यात मी विषय काढला. दादा म्हणाले, ‘कोण हा सत्काराचा उपदव्याप करणार?’ मी म्हटले, ‘मी करतो.’ माझ्याजवळ काय होते... पण, जिद्द होती... मी पटापट काहीजणांशी संपर्क केला. त्यात शरद पवारसाहेब होते... सुशीलकुमारजी होते... प्रतिभाताई होत्या.... बाळासाहेब थोरात होते... जयंतराव पाटील, हर्षवर्धन पाटील होते... गिरीश गांधी होते... दादांना सांगितले, ‘सगळ्या लोकांशी बोलणे झालेय....’ मग बंटीदादाला, संजयदादाला, विजय आणि अजिंक्यला या सत्काराची कल्पना दिली. त्यांनी मनापासून पुढाकार घेतला. पुढची व्यवस्था सगळी त्यांनी केली. मग नेहरू सेंटरचा हॉल ठरवला. दादा सांगत होते की, ‘एखादा आणखी मोठा नेता हवा...’ आणि दादांनी फोन लावला... कोणाला? तर देशाचे माजी पंतप्रदान एच. डी. देवेगौडासाहेब यांना. मी समोरच बसलो होतो. तिकडून देवेगौडासाहेब काय बोलतात तेही दादांनी ऐकवले... एक मिनिटातच त्यांनी कार्यक्रमाचे आमंत्रण स्वीकारले... आणि २२ अॅाक्टोबर २०१८ च्या त्या भव्य- दिव्य समारंभाला देवेगौडासाहेबही आले. आयुष्यामध्ये ज्या काही मनाच्या सामाधानाच्या फार मोठ्या जागा आहेत, त्यात दादांचा एवढा मोठा सत्कार सहज विषय निघून केल्याचे फार मोठे समाधान मला आयुष्यभर आहे. कारण दादा हे जीव लावण्यासारखेच माणूस होते. सात्विक, शांत पण निश्चयी... तसे थोडेसे तापट पण होते... पण, राग दाखवत नव्हते... कदाचित त्याचाही त्यांना त्रास होत असावा. डी. वाय. पाटील स्टीडीयमवरील एखाद्या सामन्याला दादा जाणार असले की, त्यांचा फोन यायचा... शक्य होईल तेव्हा जायचो... पण दादांच्या घरी ते मुंबईत असताना प्रत्येक आठवड्यात दोन-अडीच तास त्यांच्याशी बसल्याशिवाय मला चैन पडेनासे झाले होते.
काही वर्षांपूर्वी ते कोल्हापूरलाच राहयला गेले. दादांची आठवण मधून-मधून यायची... मग एक दिवस तडक कोल्हापूरला थेट दादांच्या घरी गेलो... दादा नेहमीसारखेच कोचावर शांतपणे बसले होते... सोबत वसंतदादांचे सचिव यशवंत हाप्पे आणि मुंबईचे माझे मित्र अशोक मुन्शी होते. मला पाहताच दादांच्या चेहऱ्यावरील आनंद आजही विसरता येत नाही. त्यांनी उभे राहून चक्क मिठी मारली. काही नाती कशी निर्माण होता... कशी टिकतात.. आणि का जीव लावतात... याची उत्तरे मिळत नाहीत. पण, मनामध्ये त्या व्यक्ती एक जागा तयार करून जातात... वसंतदांदांप्रमाणेच डी. वाय. दादा यांचीही अशीच एक मनात जागा आहे... त्यांनी कितीजणांना कॉलेजमध्ये प्रवेश देताना मदत केली असेल... किती रुग्णांचे बील त्यांनी माफ करून टाकले असेल त्याचाही तपशील देता येईल... पण त्यांनी कधीही कशाची जाहिरात केली नाही. मोठेपणा मिरवला नाही... ते त्यांच्या मिजाशीत जगले. राजकारण जेव्हा पटले नाही तेव्हा बाजूला झाले. पण राजारामबापूंबद्दल त्यांना शेवटपर्यंत आदर होता. बापू जनता पक्षात गेले ते त्यांना फारसे मान्य नव्हते... त्यांनी मला तसे बोलूनही दाखवले. पण त्यावेळचे चंद्रशेखर यांनी देशव्यापी पदयात्रा केली तेव्हा महाराष्ट्रातील चंद्रशेखर यांच्या आगमनापासून महाराष्ट्राची हद्द पार करून कनार्टक राज्यात जाईपर्यंत त्या संपूर्ण पदयात्रेची व्यवस्था, खर्च फक्त आणि फक्त डी. वाय. दादांनी केला, हे मला ठामपणे माहीत आहे. सभेमध्येसुद्धा ते मिरवत नव्हते बाजूला बसत हाेते. एका अर्थाने अशा कार्यक्रमांचे खरे कारभारी दादाच होते.
२०१९ च्या विधानसभा िनवडणुकीत दादांचा नातू म्हणजे संजय पाटील यांचा मुलगा ऋतुराज पाटील यांना कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने तिकीट दिले. त्या निवडणूक प्रचारात श्री. कोळसे-पाटीलसाहेब, मी, दादांच्याबरोबर सतत फिरलो. पन्हाळ्याच्या निवडणुकीतही दादांसोबत मी होतो. पण, स्वत:च्या निवडणुकीत दादा घरोघरी कधीही गेले नाहीत. नातवाच्या निवडणुकीत जाहीर सभेकरिता ते आलेच नाहीत. सकाळपासून दुपारपर्यंत मतदारसंघातील घर नी घर दादा आपल्या नातवाला विजयी करण्याकरिता दादा पायाला भिंगरी लावून फिरत होते. आणि ऋतुराज विजयी झाले. सयाजी हॉटेलमध्ये दादांना भेटायला तो आला... दादांनी त्याला अक्षरश: उचलून घेतले. दोन निवडणुकीत दादा विजयी झाले होते. पण, नातवाच्या विजयाने खूश झालेले आजोबा कायमचा लक्षात राहतील, इतके दादा खूश होते.
आणखी एक हृदयस्पर्शी आठवण... माझी पत्नी मंगला ३ जानेवारी २०२१ ला स्वर्गवासी झाली. त्यानंतर २४ तासांच्या आत मला भेटायला आलेले दादा मी विसरू शकत नाही. काही ऋणं जपून ठेवायची असतात. आणि नातीसुद्धा.
... असे हे डी. वाय. दादा... काल दादा गेल्याची बातमी आली. असं वाटले, असे उडत कोल्हापूरला जावे... धँुवांधार पाऊस, कोल्हापूरकडे पोहचून परत येणे... खूप इच्छा असूनही पोहोचता येत नाही, याची खंत आहे. खरंतर सांगू नये... एवढ्या प्रचंड गर्दीत आता चालण्याची शक्ती राहिली नाही. बंटीदादाला फोन करून भावना व्यक्त केल्या. सुशीलकुमारही म्हणाले, ‘तुम्ही एवढया लांब येवू नका.’ काहीवेळा हतबलता येते... तशी आज निराशा वाटते आहे. डी. वाय.
दादा निर्धाराने ९१ व्या वर्षीपर्यंत हिमतीने ठाम राहिले. पण....
जीवन का मतलब हैं..
आना है तो जाना है...
आणि हे कोणाला चुकले आहे...?
*डी. वाय. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली...*