सांगली हादरली! टिंबर एरियात जागेच्या वादातून तुफान राडा; लोखंडी रॉड अन् दगडाने ठेचून पंक्चर व्यावसायिकाचा निघृण खून, २ जखमी!
सांगली :-जागेच्या जुन्या वादातून भरदुपारी झालेल्या थरारक हाणामारीत एका पंक्चर व्यावसायिकाचा जागीच दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना सांगलीत घडली आहे. लोखंडी रॉड आणि दगडाने एकमेकांवर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यात पंक्चर व्यावसायिक शशिकांत उर्फ पप्पू शिवाजी धुमाळ (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुख्य आरोपीसह मयताचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही रक्ताळलेली घटना गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास टिंबर एरियातील रमामाई आंबेडकर उद्यानासमोर घडली.
जागेच्या वादातून रक्ताचा खेळ
मिळालेल्या माहितीनुसार, मयत शशिकांत धुमाळ यांचे गोकुळनगर परिसरात पंक्चर काढण्याचे दुकान होते. संशयित आरोपी सचिन हुलीकट्टी आणि शशिकांत धुमाळ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जागेवरून तीव्र वाद सुरू होता. गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हा वाद अचानक विकोपाला गेला. रागाच्या भरात दोन्ही बाजूंचे लोक एकमेकांवर तुटून पडले. लोखंडी रॉड आणि रस्त्यावरील भल्या मोठ्या दगडांनी एकमेकांवर हल्ला चढवण्यात आला.
घटनास्थळीच काढला प्राण, २ जण रुग्णालयात
या हिंसक चकमकीत डोक्यावर अन् शरीरावर गंभीर वार झाल्याने शशिकांत धुमाळ रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर या धुमश्चाक्रीत मुख्य आरोपी सचिन हुलीकट्टी आणि मयत शशिकांत यांचा मुलगा हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांची धावपळ झाली.
विश्रामबाग पोलिसांकडून
घटनास्थळाचा पंचनामा
भरदुपारी मुख्य रस्त्यावर घडलेल्या या थरारामुळे संपूर्ण सांगली शहर हादरून गेले आहे. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी आरोपी आणि मयताच्या मुलाला तात्काळ उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले आहे. तसेच मयत शशिकांत धुमाळ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी
विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत.