सांगली, महाराष्ट्र
Sangli Darpan जागृत वाचकांचा विश्वासू न्यूज प्लॅटफॉर्म
संपर्कासाठी 8625964000
पेड पार्टनरशिपतुमची जाहिरात येथेAdvertise with Sangli Darpan
⚡ ताज्या बातम्या
बातम्या लोड होत आहेत...

दोन कोटींच्या दंडाची भीती दाखवून १० लाख उकळण्याचा प्रयत्न; पुण्यातील लाचखोर महिला तलाठी, कोतवालावर ACB ची कारवाई

दोन कोटींच्या दंडाची भीती दाखवून १० लाख उकळण्याचा प्रयत्न; पुण्यातील लाचखोर महिला तलाठी, कोतवालावर ACB ची कारवाई
दोन कोटींच्या दंडाची भीती दाखवून १० लाख उकळण्याचा प्रयत्न; पुण्यातील लाचखोर महिला तलाठी, कोतवालावर ACB ची कारवाई

पुणे : इमारतीच्या पाया खोदकामात जास्त खोदकाम दाखवून दोन कोटी रुपयांचा दंड बसेल, अशी भीती दाखवत दहा लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शिवाजीनगर तलाठी कार्यालयातील महिला तलाठ्यासह कोतवालावर गुन्हा दाखल केला आहे.

अश्विनी दत्तात्रेय कोकाटे (वय ३७, शिवाजीनगर तलाठी कार्यालय) आणि महेश मधुकर मुंढे (वय ३०) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी एका ३७ वर्षीय कंत्राटदाराने 'एसीबी'कडे तक्रार दिली होती. तक्रारदार कंत्राटदाराच्या फर्ममार्फत सेनापती बापट रस्त्यावरील सर्व्हे क्रमांक ९६७ येथे एका व्यावसायिक प्रकल्पाच्या इमारतीचा पाया खोदण्याचे काम सुरू होते. या खोदकामाचा पंचनामा तलाठी आश्विनी कोकाटे यांनी केला. त्यांनी तक्रारदारास 'तुम्ही तीन हजार दोनशे ब्रास जास्त खोदकाम केले असून, त्यावर दोन कोटी रुपये दंड बसू शकतो,' अशी भीती दाखवली. हा दंड टाळण्यासाठी आणि तहसीलदार यांच्याकडे दंडात्मक कारवाई न करण्याचा 'निल पंचनामा अहवाल' सादर करण्यासाठी कोकाटे यांनी दहा लाख रुपयांची लाच मागितली.

या संदर्भात कंत्राटदाराने १५ जून रोजी पुणे 'एसीबी'कडे तक्रार दिली. 'एसीबी'च्या पथकाने १६ जून रोजी पडताळणी केली. त्यात तलाठी कोकाटे यांनी दहा लाखांची लाच मागून ती रक्कम कोतवाल मुंढे याच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. तसेच मुंढे यानेही ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे समोर आले. या पडताळणीच्या आधारे चार ऑगस्ट रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई 'एसीबी'च्या पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील यांच्या सूचनेनुसार पोलिस उपअधीक्षक सतीश वाळके, पोलिस निरीक्षक आसावरी शेडगे, विकास आडके, वैशाली माकर आणि दीपक काकडे यांच्या पथकाने केली.
Sangli Darpan

विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी
Sangli Darpan सोबत रहा.

8625964000  •  info.sanglidarpan@gmail.com

Digital Growth Partner ADROOTZ Digital Marketing & IT Solutions

9371515397  •  adrootzdigital@gmail.com

तुमच्या व्यवसायाची जाहिरात या व्यासपीठावर करा →