सांगली, महाराष्ट्र
Sangli Darpan जागृत वाचकांचा विश्वासू न्यूज प्लॅटफॉर्म
संपर्कासाठी 8625964000
पेड पार्टनरशिपतुमची जाहिरात येथेAdvertise with Sangli Darpan
⚡ ताज्या बातम्या
बातम्या लोड होत आहेत...

अखेरच्या श्वासापर्यंत बापाची लेकींसाठी धडपड... तिकडून मेसेज आला- 'VIDEO पाठवून द्या'; काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार!

अखेरच्या श्वासापर्यंत बापाची लेकींसाठी धडपड... तिकडून मेसेज आला- 'VIDEO पाठवून द्या'; काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार!
अखेरच्या श्वासापर्यंत बापाची लेकींसाठी धडपड... तिकडून मेसेज आला- 'VIDEO पाठवून द्या'; काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार!

आयुष्यभर कष्ट करून आपल्या तीनही मुलींना उच्चशिक्षित केले, त्यांच्या करिअरसाठी संपूर्ण कमाई खर्च केली, मात्र त्याच बापाच्या अंतिम संस्काराला यायला मुलींकडे वेळच नव्हता.

आजाराने ग्रस्त असलेल्या बापाची शेवटची इच्छा पूर्ण झालीच नाही. अखेरच्या क्षणी वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनीच त्या अभागी बापावर अंत्यसंस्कार केले. हृदय हेलवणारी गोष्ट म्हणजे, स्वतःच्या डोळ्यासमोर अंत्यसंस्कार पाहण्याऐवजी मुलींनी व्हिडिओ कॉलवर अंत्यसंस्कार पाहिले आणि 'सगळं काम व्यवस्थित झालं का? मला व्हिडिओ पाठवून द्या' असा निष्ठुर सवाल कर्मचाऱ्यांना केला. कौटुंबिक नात्यांचा अंत दाखवणारी ही अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे.

एका वृद्ध बापाचा अभागी शेवट

हरियाणातील सोनीपत येथील एका वृद्धाश्रमात ही दुर्दैवी घटना घडली. पूर्वी महाराष्ट्रात एक यशस्वी कापड व्यावसायिक म्हणून नावारूपाला आलेले शिवचरण रतन गुप्ता हे गेल्या 18 महिन्यांपासून आपल्या पत्नीसोबत या वृद्धाश्रमात राहत होते.

काही काळापूर्वी पत्नीचे निधन झाल्यानंतर ते अत्यंत एकटे पडले होते. त्यांना मुलगा नव्हता, त्यामुळे त्यांनी आपली संपूर्ण संपत्ती आणि मेहनत तीन मुलींच्या शिक्षणावर खर्च केली. त्यांची मोठी मुलगी अनिता नेपाळमध्ये शिक्षिका आहे, दुसरी मुलगी निशा उत्तर प्रदेशातील आझमगड येथे राहते, तर तिसरी मुलगी प्रिया मुंबईत स्थायिक आहे.


'व्हिडिओ पाठवून द्या'; अंत्यसंस्कारासाठी मुलींची ऑनलाईन हजेरी

शिवचरण यांची प्रकृती खालावल्यानंतर वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापनाने तीनही मुलींशी संपर्क साधून त्यांना तातडीने बोलावून घेतले. मात्र, प्रत्येक मुलीने येण्यास असमर्थता दर्शवत वेगवेगळी कारणे दिली. रात्रीच्या वेळी शिवचरण यांनी अखेरचा श्वास घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांनी मृतदेह जपून ठेवण्याची तयारी दर्शवली, जेणेकरून मुली शेवटचे दर्शन घेऊ शकतील.

मात्र, 'आमच्याकडे यायला वेळ नाही' असे सांगत त्यांनी येण्यास स्पष्ट नकार दिला. मोठ्या मुलीने अंत्यसंस्काराच्या खर्चासाठी ऑनलाईन 5100 रुपये पाठवले आणि अंत्यसंस्काराचे थेट प्रक्षेपण व्हिडिओ कॉलवर पाहिले.

अस्थिविसर्जनासाठीही वेळ मिळेना

मुलींनी सुरुवातीला अंत्यसंस्काराची राख (अस्थी) जपून ठेवण्यास सांगितले होते, मात्र नंतर वेळेअभावी त्यांनी कर्मचाऱ्यांनाच गंगेत अस्थिविसर्जन करण्याची विनंती केली. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी कर्मचाऱ्याला विचारतेय, 'सगळं काम नीट झालं का? मला एकदा व्हिडिओ पाठवून द्या. अजून किती वेळ लागेल?' त्यावर कर्मचाऱ्याने 10 ते 15 मिनिटांत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल असे उत्तर दिले.

स्वतःच्या बापाच्या निधनानंतर मुलींनी दाखवलेल्या या निष्ठुरतेमुळे वृद्धाश्रमातील कर्मचारी आणि स्थानिक नागरिक अत्यंत स्तब्ध झाले आहेत.
Sangli Darpan

विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी
Sangli Darpan सोबत रहा.

8625964000  •  info.sanglidarpan@gmail.com

Digital Growth Partner ADROOTZ Digital Marketing & IT Solutions

9371515397  •  adrootzdigital@gmail.com

तुमच्या व्यवसायाची जाहिरात या व्यासपीठावर करा →