देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त करणारा दावा तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुणाल घोष यांनी केला आहे. एनडीएत गेलेले सहा बंडखोर खासदार आणि ५० टक्क्यांहून अधिक आमदार पुन्हा पक्षात परतण्याच्या तयारीत असल्याचा दावा त्यांनी केला. या वक्तव्यानंतर राष्ट्रीय राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
'ममता बॅनर्जी यांच्या संपर्कात आमदार'
माध्यमांशी बोलताना कुणाल घोष म्हणाले की, एनडीएमध्ये गेलेले सहा खासदार आणि निम्म्याहून अधिक आमदार सध्या थेट ममता बॅनर्जी यांच्या संपर्कात आहेत. मात्र, योग्य वेळ येईपर्यंत त्यांची नावे किंवा अचूक संख्या जाहीर करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपवर गंभीर आरोप
घोष यांनी भाजपवरही गंभीर आरोप करत, बंडखोर लोकप्रतिनिधींना पक्षात परतण्यापासून रोखण्यासाठी पोलिस आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा दावा केला. दबावाचे राजकारण सुरू असल्याने अनेक जण उघडपणे भूमिका घेऊ शकत नसल्याचेही त्यांनी म्हटले.
'२४ तासांत ५६ ते ५८ आमदारांची रॅली काढू'
कुणाल घोष यांनी पुढे दावा केला की, जर पोलिसांचा दबाव केवळ एका दिवसासाठी हटवण्यात आला, तर पुढील २४ तासांत ५६ ते ५८ आमदारांची रॅली काढून दाखवू. यावरून पक्षातील अनेक आमदार पुन्हा तृणमूलमध्ये येण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सूचित केले.
निवडणुकीनंतर पक्षात अंतर्गत संघर्ष
दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद वाढल्याचे चित्र आहे. बंडखोर गटाच्या हालचाली आणि नेतृत्वावरील संघर्षामुळे पक्षात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कुणाल घोष यांच्या ताज्या दाव्यामुळे आता पश्चिम बंगालच्या राजकारणात पुढे काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.