सांगली, महाराष्ट्र
Sangli Darpan जागृत वाचकांचा विश्वासू न्यूज प्लॅटफॉर्म
संपर्कासाठी 8625964000
पेड पार्टनरशिपतुमची जाहिरात येथेAdvertise with Sangli Darpan
⚡ ताज्या बातम्या
बातम्या लोड होत आहेत...

मोठी बातमी! राष्ट्रवादीला सापडली रुपाली चाकणकरांची रिप्लेसमेंट; 'या' नेत्याकडे सोपवली महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

मोठी बातमी! राष्ट्रवादीला सापडली रुपाली चाकणकरांची रिप्लेसमेंट; 'या' नेत्याकडे सोपवली महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा
मोठी बातमी! राष्ट्रवादीला सापडली रुपाली चाकणकरांची रिप्लेसमेंट; 'या' नेत्याकडे सोपवली महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्ष संघटनेमधील दोन प्रमुख पदांवर नियुक्ती जारी केली आहे. विशेष म्हणजे नियुक्ती जाहीर झालेल्या पदांमध्ये महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही समावेश आहे. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांनी पक्षाचं महिला प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर चार महिन्यांनी हे पद भरण्यात आलं असून पक्षाच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुपाली चाकणकरांची जागा घेणाऱ्या महिला नेत्याला स्वत: नियुक्तीपत्र दिलं आहे. 

रुपाली चाकणकर यांनी 20 मार्च रोजी महाराष्ट्राच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अवघ्या सात दिवसांनी म्हणजेच 27 मार्च रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा सुपूर्द केला. आता या पदावर वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शिवाय युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरेंची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही नावांची चर्चा मागील दोन महिन्यांपासून पक्षांतर्गत बैठकींमध्ये सुरु होती.

रुपाली चाकणकरांची जागा घेतली
भोंदूबाबा अशोक खरातच्या निकटवर्तीय असल्याने रुपाली चाकणकर आणि त्यांच्या भगिनी यांच्यावर मार्च माहिन्यात बरीच टीका झाली. खरात प्रकरण समोर आल्यानंतर त्याचे रुपाली चाकणकरांसोबतचे फोटो समोर आल्यावर टीकेची झोड उठली. या टीकेनंतर रुपाली चाकणकरांना पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदासोबतच राज्याच्या महिला आयोगाचं पदही सोडावं लागलं. त्यांनी पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवारांकडे राजीनामा सोपवला होता. तेव्हापासूनच हे पद रिकामं होतं. या पदावर आता वैशाली नागवडे यांची वर्णी लागली आहे.
कोण आहेत राष्ट्रवादीच्या नव्या महिला प्रदेशाध्यक्षा?

वैशाली नागवडे या सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या म्हणून पक्ष संघटनेत कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस यासारखी महत्त्वाची पदं भूषवली आहेत. पुणे जिल्ह्यातील विशेषतः दौंड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सक्रिय नेतृत्वापैकी वैशाली नागवडे या एक आहेत. 2017 आणि 2020 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत राहू-खामगाव (गट क्रमांक 48) मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती.

निवड झाल्यानंतर काय म्हणाल्या?
"राजकारणाची सुरुवात झाल्यापासून अजित पवारांमुळे घडलो आहे. आज ते हवे होते. आज सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पत्र मिळालं आहे. आज जबाबदारी खूप वाढली आहे. दादांची कामाचा माणूस ही ओळख आम्हाला आणखी तळागाळात घेऊन जायची आहे. गेल्या 26 वर्षांचा हा प्रवास आहे. पंचायत समिती सदस्य, महानंद दूध डेअरी चेअरमन पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष पद 14 वर्ष काम करण्याची संधी मिळाली आहे," अशी पहिली प्रतिक्रिया वैशाली नागवडे यांनी नियुक्तीनंतर नोंदवली आहे.

जबाबदारी मोठी समजून काम करायला हवं, असंही वैशाली नागवडे म्हणाल्यात. "पुणे शहरात आम्ही काल आंदोलन केलं आहे. शाहू फुले आंबेडकर विचारधारा जपणारा महाराष्ट्र आहे. काँग्रेसला हे कळायला हवं. किती मोठं दुःख पचवून त्या कशाप्रकारे पदावर आल्या हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे त्यांच्यबाबत जबाबदारीने बोलणं गरजेचे होतं. एकीकडे बारामतीमध्ये विधानसभेला मदत केली म्हणायचं आणि दुसरीकडे अशा प्रकारे टीका करायची हे काँग्रेसला शोभणारे नाही," असा टोला वैशाली नागवडेंनी 'गुंगी गुडीया' विधानावरुन काँग्रेसला लगावला आहे.
भाजपाच्या कार्यक्रमात वैशाली नागवडेंना झालेली मारहाण

वैशाली नागवडे या पुण्यात राहतात. त्यांनी पुण्यातील एस.पी. कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. 2022 मध्ये पुण्यात स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमादरम्यान भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांना मारहाण झाली होती. त्यानंतर डेक्कन पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल झाला होता. पक्षाकडून जिल्हा बँक संचालकपद, महिला आयोग अध्यक्षपदासाठी आपला विचार केला जात नसल्याच्या मुद्द्यावरुन त्यांनी अनेकदा नाराजी व्यक्त करुन दाखवली आहे. मात्र आता त्यांची एक मोठ्या पदावर नियुक्तीसाठी विचार करुन पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्याची तयारी दर्शवली आहे.

युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे
निखिल ठाकरे यांनी सुरुवातीला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष आणि नागपूर जिल्हा प्रभारी म्हणून काम पाहिले आहे. महाराष्ट्रातील तरुणांचे संघटन करणे, युवकांचे प्रश्न मांडणे आणि पक्षाची ध्येयधोरणे तरुण मतदारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी निखिल यांच्या खांद्यावर असणार आहे. "आज अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे. मोठी जबाबदारी आहे. पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर उभा राहत असतो. संघटना ही आमच्या नेत्याचा स्वाभिमान असतो त्यांतून सूरज चव्हाण यांची घटना घडली होती. पुनः असं काही होणार नाही," असं निखिल ठाकरेंनी पद स्वीकारल्यानंतर म्हटलंय. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी या दोन्ही पदाधिकाऱ्यांना नियुक्तीची पत्र देण्यात आली.

Sangli Darpan

विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी
Sangli Darpan सोबत रहा.

8625964000  •  info.sanglidarpan@gmail.com

Digital Growth Partner ADROOTZ Digital Marketing & IT Solutions

9371515397  •  adrootzdigital@gmail.com

तुमच्या व्यवसायाची जाहिरात या व्यासपीठावर करा →