जालना शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. शहरातील नामांकित महाविद्यालयातील लाचखोर प्राचार्यासह शिपायाला एसीबी विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. महाविद्यालयातील प्राचार्य, अधीक्षक , लिपीक , शिपाई आणि ग्रंथपाल यांना दीड लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलंय.
सेवानिवृत्त प्रबंधकाला कालबद्ध पदोन्नतीचा लाभ आणि भविष्य निर्वाह निधी अर्थात जीपीएफची रक्कम मिळवून देण्यासाठी एक लाख पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने ही कारवाई केली आहे. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीकडून सापळा रचण्यात आला आणि कॉलेज मध्येच लाचेची रक्कम स्वीकारताच महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल हिवराळे, अधीक्षक बबन राठोड यांच्या सह पाचही जणांना ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईमुळे जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात एसीबीची धडक कारवाई; ५ हजारांची लाच घेताना सावर्डेचा मंडळ अधिकाऱ्याला अटक
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. सातबारा उताऱ्यावर जमिनीचा फेरफार मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना सावर्डे येथील मंडळ अधिकारी अनिल जाधव याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडलं.
सावर्डे येथील मंडळ अधिकारी कार्यालयातच सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. एका निवृत्त मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीनंतर एसीबीने ही कारवाई केली असून, या घटनेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.