सांगली : महांकाली साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्नशील - आमदार विनय कोरे यांची माहिती
सांगली: वारणा समुहाने अनेक साखर कारखाने चालवायला घेतले. मात्र महांकाली साखर कारखान्याचे वैभव पुन्हा नव्या वैभवात रूपांतरित करण्यास सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. या कारखान्याला अडचण येणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ असे प्रतिपादन जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष, आमदार विनय कोरे यांनी केले.
येथील शाही दरबार हॉलमध्ये सभासदांचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. आम्हाला हा कारखाना खरेदी करता आला असता. पण महांकाली कारखाना सभासदाच्या मालकीचा रहावा. जागा, मालमत्ता न विकता तो सुरू करण्याचा प्रयत्न करूया. महांकाली कारखाना सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे, असे कोरे यांनी सांगितले.
सभासद मेळाव्यात जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित म्हणाले, “महांकाली तालुक्याची शान आहे. आपण सगरे कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. तर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे म्हणाल्या, “कारखाना बंद पडल्यापासून अनेक दौरे केले. शासनाचे धोरण नेहमी बदलत असल्याने अडचणी आल्या. येत्या काळात थकीत पगार, पतसंस्था देणी, ग्रॅज्युइटीसह सर्व देण्यासाठी प्रयत्न केले जातील. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, महांकाली अध्यक्ष अनिता सगरे, शंतनु सगरे, अनुराधा सगरे, प्रशांत शेजाळ, भानुदास पाटील, रणजीत घाडगे, चंद्रकांत लोंढे, अनिल लोंढे, रमेश खोत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रा. राजाराम पाटील यांनी सूत्रसंचालन केले.